पायाने अधू असलेल्या निरंजनीची-नीरूची कथा 'मुद्रा'तून उमटत जाते. आपल्यातील अपंगत्वापेक्षा अभिजात सुरांचा मिळालेला वारसा हीच तुझी खरी ओळख-सुरांसह आपल्या गायक वडिलांकडून नीरूला मिळालेली हीही एक शिकवण... हा वारसा जपताना स्वतःमधील शारीरिक कमतरतेकडे अधिकाधिक तटस्थपणे पाहत, स्वतःला स्वरांतून वाढवत, ओळखत नेणाऱ्या नीरूचा हा अनोखा प्रवास-परंपरेचा, संस्कृतीचा, मानवी नातेसंबंधांचा दुसरीकडे शोधही घेणारा.
आशा बगे यांच्या लेखनात सातत्याने गुंजणारं संगीत... स्वरांचा दरवळ इथे ठळक पार्श्वभूमी होतो. संगीतासारख्या कलेच्या चिरंतनत्वाचा अर्थ मानवी जीवनाबद्दलच्या मूलभूत प्रश्नांच्या तळापर्यंत कसा झिरपत गेला आहे हे मांडत, नव्या परिमाणांसह 'मुद्रा' प्रकटत जाते. आणि उत्कट अशी सर्जनशील अभिजात कलाकृती वाचल्याचा दीर्घकाळ मनात रेंगाळणारा सात्त्विक आनंद वाचकांनाही बहाल करत राहते.