कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन,
जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्त्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेत अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात. प्रेमच ईश्वर आहे. खरा प्रश्न प्रेमाचा शोध घेण्याचा, मनातून प्रेम जसे हरवायला लागते, तसे जीवन भौतिक गोष्टींनी भरून जाते. जसे प्रेम वाढायला लागते, तशा भौतिक गोष्टी नष्ट होतात आणि साक्षात परमेश्वर अवतरतो.
प्रेमाचा अर्थ आहे 'स्व'चे रूपांतर. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला. जो कोणी आपला अहंकार सोडेल, त्याच्यावर प्रेमाचे ढग बरसतील.
तारुण्य ! जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वतःतल्या शांतीमध्ये डुवून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही! अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारे काही बदलून जाते. मग कोणतेही मतभेद, कोणत्याही भिंती उरत नाहीत. जेथे फक्त प्रेमाचा आविर्भाव होत आहे. जेथे फक्त प्रेमच आहे अनंत प्रेमच आहे आणि जेथे अहर्निश प्रेमाचे नृत्य चालू आहे तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसेल.