कुटुंब पाठीशी असलं तर काय होऊ शकते...?
एक आजारी, शांत मुलगा... गप्पगप्प राहणारा... कसा कुणाच्या लक्षात यावा ? त्याचं लैंगिक शोषण... तरीही तो गप्पच... कसं कुणाला समजावं? त्याला जाणवणारं स्वतःमधलं स्त्रीत्व.. ते मात्र समाजाच्या नजरेत आलेलं... त्यावरून चिडवणंही सुरू झालेलं... पण त्याला वाटणारं मुलांचं आकर्षण... कसं कुणाला जाणवावं ? त्याला पडणारे प्रश्न... का असं होतंय? मी कोण ? कसे कुणाला ऐकू यावेत ? त्याची घुसमट... तडफड... आणि मग त्यानंच शोधलेलं उत्तर... आधी 'गे' आणि नंतर... हिजडा !! 'तो' लक्ष्मी ते 'ती' लक्ष्मी... कुटुंबाला धक्का ! समाजाला धक्का ! पण आता 'ति'ची मात्र मान ताठ! बदललेलं आयुष्य, बदललेलं जग... त्यातले धक्के, टक्के-टोणपे... आपल्यांच्या वेदना... समाजाशी सामना... कुटुंबाचा मात्र पाठिंबा ! या सगळ्यातून सावरलेलं, उभारलेलं आणि नंतर एका उंचीवर नेलेलं आयुष्य. मुंबईतल्या आपल्या कम्युनिटीसाठी काम करता करता लक्ष्मी
महाराष्ट्र, देश आणि थेट जागतिक पातळीवर, यूएनमध्ये पोहोचली...
आई-वडिलांच्या संस्कारांमुळे प्रामाणिकपणे काम करत राहिली,
अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहिली, न्याय मिळवून देत राहिली...
हे सगळं सांभाळताना आपली डान्सची 'पेंशन' जपत राहिली, कला इतरांना देत राहिली... छोट्या आणि मोठ्या पडद्यावरून समाजाला
सतत सामोरी येत राहिली...
माणसं जोडत राहिली, त्यांना वाचत राहिली, अनुभवातून शिकत राहिली, समृद्ध होत राहिली... अजनही होतेच आहे...
कुटुंब पाठीशी असल होऊ शकतं !!