मैं हूँ भारतीय' या हिंदी पुस्तकाचा अनुवाद
हे पुस्तक म्हणजे अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलेल्या व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणात काम करण्याची संधी मिळालेल्या एका पुरातत्त्ववेत्त्याची आत्मकथा आहे. मार्क्सवादी इतिहास तज्ज्ञांच्या संघटित ताकदीला त्यांच्याच गडकिल्ल्यांत आव्हान देऊन एकटा माणूसही कशा प्रकारे साम्राज्याला भिडू शकतो, याची प्रेरणा, हे पुस्तक देतं. भारतीय पुरातत्त्व विभागाने कशाप्रकारे काम करावं किंवा स्वतःला कसं सादर करावं, या बाबतीत त्यांच्या सूचना, सर्वसाधारण माणसाला नवीन विचारांची प्रेरणा देतात. शिवाय भविष्यात या विभागासाठी नवीन योजना तयार करणाऱ्यांना मार्गदर्शनही करतात. या विभागाकडे असलेल्या अपार शक्यतांकडे एकामागोमाग सत्तेवर येणाऱ्या सरकारांनी (शासनकर्त्यांनी) कसं दुर्लक्ष केलं, या बाबीकडेही ते लक्ष वेधतात.
एखाद्या सक्रिय पुरातत्त्ववेत्त्याची प्रकाशित होणारी ही पहिलीच
डायरी आहे. अन् म्हणूनच ती या विषयांतील अनेक बारीक
तपशिलांबरोबर आपल्याला मनोरंजकरित्या अंतर्मुख होऊन
विचार करायला भाग पाडते; पण त्याचबरोबर एखाद्या
पुरातत्त्ववेत्त्याने धार्मिक व क्षेत्रीय पक्षपातापासून स्वतःला
कसं वेगळं हवं, या बाबतीतलं स्पष्ट मतही मांडते.
भारतीयत्व अन् राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारी ही एक
अतिशय संवेदनशील व वाचनीय कलाकृती!