पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना १९७७ साली करण्यात आलेली अटक आणि दोन वर्षांच्या न्यायनिवाड्यानंतर त्यांना देण्यात आलेली फाशी, ही पाकिस्तानात घडणाऱ्या राजकीय रंगमंचावरील एका भयभीषण नाट्याची नांदी होती... एका विदग्ध व्यथेची चाहूल होती... एका शापित शोकांतिकेची सुरुवात होती... पण एका तपाच्या कालावधीत क्रूर आणि कराल लष्करशाहीविरुद्ध प्रखर संघर्ष करून पंतप्रधानपदाच्या सिंहासनावर भुट्टोंच्या कन्येनं मोठ्या दिमाखात आरूढ व्हावं, या नियतीच्या विलक्षण खेळीला काय म्हणावं...? म्हणूनच असं म्हणावं लागेल की बेनझीर भुट्टो म्हणजे विसाव्या शतकातील इस्लामी स्त्रीच्या अस्मितेचा एक अलौकिक आविष्कार होता!