देशीवादाच्या आक्रमक रूपाने घाटाचा एवढा तिरस्कार केला आहे की, लेखन ही कला असते, ही सामान्य बाबच अनेक लेखक विसरून गेले आहेत. त्यामुळे समाजशास्त्रीय अभ्यास आणि दैनंदिन्या आत्मकथनात्मक वा वास्तववादी कथा-कादंबरी म्हणून मिरवल्या जात आहेत.
अद्भुतता, कल्पनाशक्ती यांची वास्तवाशी सांगड घालण्याचं मार्खेजचं तंत्र उलगडण्यासाठी त्याचं जीवन, त्याच्या परिसराचं सामाजिक-राजकीय वास्तव यांचा शोध घ्यावा लागतो. मार्खेजच्या जादूई वास्तववादाचं तंत्र आणि मंत्र उलगडलं तर मराठी कथात्म साहित्यातील घाट आणि कला यांचं आकलन अधिक समृद्ध होईल.