'धर्म' म्हणजे निव्वळ नैतिकता नाही. तसे असते तर नव्याण्णव टक्के माणसे धार्मिक असतात व तरी अनीती एवढी पसरलेली आहे, असे झाले नसते. 'धर्म' म्हणजे निव्वळ आध्यात्मिक विचार व साधना नाही. तसे असते तर सगळी धार्मिक माणसे आध्यात्मिक झाली असती; तसे दिसत नाही. 'धर्म' म्हणजे निव्वळ समाजधारणेचे नियम नाहीत, समाजसेवेची स्फूर्ती व क्रिया नाही. तसे असते तर धार्मिक व्यक्तींनी व माणसांनी गजबजलेले समाज हिंस्र अन्यायांनी, संघर्षांनी व संकटांनी ग्रस्त दिसले नसते.
जेव्हा धर्माच्या 'दास्या'चा प्रश्न आपण विचारात घेतो तेव्हा धर्माचे नैतिक, आध्यात्मिक व समाजसेवेला प्रवृत्त करणारे गुण आपण विचारात घेतो व त्यांचे वर्तमानातले व इतिहासातले अस्तित्व मान्य करतो, परंतु ते गुणच तेवढे न पाहता, धर्माचे अवगुण किंवा दोषही लक्षात घेतो. या दोषांमुळे धर्म ही भावना आणि प्रत्यक्ष संस्था, माणसांच्या मनाला दास बनवतात, माणसांना आग्रही, अहंकारी व प्रसंगी क्रूर बनवतात. या वास्तवाची आपण दखल घेतो. तशी दखल घेणे जरूरच आहे. ती दखल न घेणे हे भाबडेपणाचे तरी आहे किंवा दांभिकपणाचे आहे. धर्माच्या फक्त गुणांचा गौरव करणे म्हणजे धर्मदास्याचे वास्तव नाकारणे, वर्तमानात व इतिहासात घडलेल्या धर्मप्रेरित क्रूरतेला विसरणे होईल. हा विसर धर्मगौरवाच्या अभिनिवेशाने किंवा स्वार्थामुळे माणसांना पडतो. म्हणून धर्माच्या दोषांवर, धर्मभावनेचा अफूसारखा परिणाम होतो या धडधडीत सत्यावर भर देणे काही संदर्भात भाग पडते.