टेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला चाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेण्ट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेऊन जातो. कॅमेऱ्याच्या साक्षीने उलगडणारी गोष्ट त्याच वेळी प्रभावीपणे सांगणं आणि त्याच कथानकावर वृत्तपत्रात लिहिताना चार पावलं पुढे जाऊन वेगळाच दृष्टान्त देणं या दोन्ही क्षमता असणारी माणसं भारतीय माध्यमांमध्ये फारच थोडी आहेत. हर्षा भोगलेचं वेगळेपण नेमकं यातच आहे.