एक हसणारी स्मितवदना स्त्री ज्या घरात असेल, जिच्या पावलात प्रेमाची गाणी असतील, जिच्या चालण्यात झंकार असेल, जिच्या हृदयात प्रसन्नता असेल, जिला जगण्यातला एक आनंद मिळत असेल, जिचे श्वासन् श्वास प्रेमानं भरलेले असतील, अशी स्त्री ज्या घराच्या केंद्रस्थानी असेल त्या घरात एक नवा सुगंध, एक नवं संगीत निर्माण होईल आणि हा एका घराचा प्रश्न नाही. हा प्रत्येक घराचाच प्रश्न आहे. प्रत्येक घरात जर हे शक्य झालं तर एक असा समाज निर्माण होईल जो शांत असेल, आनंदी असेल, प्रफुल्लित असेल. हा मानव समाज परमात्म्याच्या जवळ जाण्याची जी मोठी क्रांती आहे त्या क्रांतीत स्त्री अनेक अर्थांनी सहयोगी होऊ शकते. त्या क्रांतीची थोडीशी सूत्रं मी सांगितली. स्त्रीने आपल्या आत्म्याची आणि अस्तित्वाची घोषणा केली पाहिजे. स्त्रीने संपत्ती होण्याचं नाकारलं पाहिजे. स्त्रीनं पुरुषांनी तयार केलेल्या विधानांना वर्गीय म्हटलं पाहिजे आणि आपल्यासाठी कोणतं विधान करायचं ते तिनंच ठरवलं पाहिजे. प्रेमाशिवाय जीवनातली सगळी व्यवस्था अनैतिक असल्याचं स्त्रीनं मानलं पाहिजे. प्रेम हाच नैतिकतेचा मूलमंत्र आहे. एवढं जर घडून आलं तर एका नव्या स्त्रीचा जन्म होऊ शकेल