मोजकीच पण गुणवान कथानिर्मिती करणाऱ्या कथाकार म्हणून प्रतिभा कणेकर यांचं नाव मराठी वाचकांना सुपरिचित आहे.'कौलं उडालेलं घर' या नव्या संग्रहातील त्यांच्या कथा संथ लयीतील आलापीसारख्या आहेत. आशयसूत्र चहूबाजूंनी फुलवत, त्याचे शक्य तितके पदर उलगडत लिहिलेल्या या कथा वाचकाला सकस वाचनाचे समाधान देतात. कणेकरांच्या या कथा स्त्रीकेंद्री आहेत. सर्जनशील गांभीर्यानं स्त्रीच्या जगण्याचा तळ त्यांनी शोधला आहे. 'उत्तर हे गुलबकावलीचं फूल आहे, त्याचा शोध घेण्यासाठी आपण जी धडपड करतो नं, ते आपलं आयुष्य असतं बहुधा' असं त्यांचं पात्र म्हणतं, ते तंतोतंत प्रत्ययाला येतं या कथांमधून. त्या अर्थानं प्रत्येकीच्या घराची कौलं अशी नं तशी उडालेली असतातच. जगण्याचे किती पातळ्यांवरचे प्रश्न पडतात या पात्रांना, शारीर-मानस-भावनिक पातळीवरचे तर आहेतच. पण जगण्याचा स्तर उंचावताना करायच्या संघर्षाचे आहेत आणि व्यवस्थेबद्दलचेही आहेत. त्या अर्थानं या कथा व्यापक समाजभानही आविष्कृत करतात. या कथांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेनं विविध रूपबंध हाताळले आहेत. कधी पत्रात्मक मनोगत तर कधी केवळ संवादात्मक आणि सहज, साधी, पारदर्शी भाषाशैली त्यामुळे वाचकाला बांधून ठेवण्यात या कथा कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत.