मृण्मयीच्या लेखांचं हे असं गारुड आहे. गेले दोन दिवस तिचे लेख पाठलाग केल्यासारखे माझ्या मागाव आहेत. अर्थात त्याला तिची मनमोकळी लेखनशैली कारणीभूत आहे. अत्यंत साधी गोष्ट सांगायला सुरवात करीत मृण्मयी हळूहळु एकदम अशा टोकाला आपल्याला नेते की आपण मान डोलवत तिच्या गोष्टीला "हो, अगदी बरोबर!" असे मनातल्या मनात म्हणतो. अर्थात ह्या सार्या स्फूट गोष्टींमागे जसा तिचा पडताळा घेण्याचा स्वभाव आहे तसा बारीक बारीक गोष्टी निगुतीने जमवण्याचा संग्राहक स्वभावही आहे. मृण्मयीचे हे लेखन मला अशाच नजरेने अगदी हृदयाजवळचे वाटते. ते फार मोठा सल्ला देत नाही, हुशारीचा आव आणत नाही, काही तत्वज्ञान सांगण्याची पोझ घेत नाही, खळाळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाकडे पाहत राहावे तसे आपण ह्या लेखातून दिसणाऱ्या मृण्मयीच्या नितळ मनाकडे पाहत राहतो आणि कधी सुखाहून जातो तेही कळत नाही. ~ कवी अरुण म्हात्रे