दुर्गाबाईंच्या ललितलेखांना विशिष्ट आकृतिबंधाची चौकट कधीच मानवली नाही. एखाद्या साध्याशा दृश्यानं, दैनंदिन जीवनातील प्रसंगानं त्यांचा लेख सुरू होतो आणि मनातले विचार जसे, ज्या दिशेने वाहात जातील तसा तो लेख पुढे जात राहतो. त्यांच्या मनात पडणारं अनुभवाचं बीज कसंकसं वाढतं, फुलारतं ते पाहाणं वाचकांसाठी आनंददायी असतं. एखाद्या चित्रकारानं समोरचं दृश्य पाहाता-पाहाता रेखाटन करावं, आपला कुंचला वा पेन्सिल भराभर चालवून ते दृश्य चित्रफलकाच्या, कागदाच्या चौकटीत बसवत असतानाच, त्या चौकटीपलीकडचं काही सांगण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे दुर्गाबाईंचा ललितलेख असतो. मर्यादित आणि त्याच वेळी अमर्यादांचं सूचन करणारा. त्यांचं चिंतनशील मन त्या लेखाच्या आकृतिबंधाच्या पलीकडचं, आशयाला भरीवपणा देणारं असं बरंच काही वाचकाला देऊन जातं...
ललितनिबंधाची निश्चित, पूर्वसुरींनी रूढ केलेली चाकोरी त्यांना मानवलीच नाही. त्यांच्या लेखनाची प्रक्रिया अत्यंत उत्स्फूर्त आणि गतिमान होती. एखाद्या विषयबीजाचे जाणीवपूर्वक संगोपन त्यांच्याकडून होत नसावे. त्याऐवजी गतकाळातील अनुभवाचं संचित एखाद्या क्षणी जिवंत होऊन शब्दरूप घेते आहे अशी प्रक्रिया त्यांच्या प्रतिभेद्वारा घडत असावी. काळाच्या प्रवाहातील प्रत्येक क्षणाचं महत्त्व जाणणारा, त्या क्षणानुभवाचं यथातथ्य आविष्करण करण्यासाठी धडपडणारा दृक्प्रत्ययवादी कलावंत त्यांच्या साऱ्या ललितलेखनातून आपल्या प्रत्ययास येतो.