निसर्गातून बाहेर पडलेल्या माणसाने आपल्या विकासक्रमात एक सुंदर गोष्ट जन्माला घातली. तिचे नाव भक्ती ! भक्ती एकाच वेळी व्यक्तिगत आणि वैश्विकही असते. भक्ती म्हणेज आराधना, भक्ती म्हणजे अध्यात्म असा मर्यादित अर्थ घेत जग बदलण्याची तिची क्षमता मात्र आपण दुर्लक्षित करत आलो. 'भक्ती आणि धम्म' या ग्रंथात भक्तीची शक्तिशाली, संघर्षशील, विद्रोही आणि बंडखोर रूपे प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दाखवली आहेत. नव्या माणसाचे स्वप्नही भक्तीतूनच साकार होते असे सांगत हा ग्रंथ आपल्याला आठव्या शतकात घेऊन जातो. जगभर तयार झालेले विविध भक्तिप्रवाहांचे सम्यक दर्शन घडवतो. भारतातील बाऊल, अलवार यासारखे दुर्लक्षित प्रवाहही या ग्रंथात अवतरतात. मीरा, कबीर, नामदेव तुकारामही अवतरतातच, याशिवाय प्राचीन ग्रीक चैतन्यापासून ते सुफी पंथ, ख्रिश्चन गूढवादी ते पुनरुज्जीवन आणि प्रबोधनाच्या चळ्वळीपर्यंत आपला एक समग्र प्रवास घडतो. या सर्वात सुंदर वाटावी अशी गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवर झालेला धम्माचा विकास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'नवयान'. विविध ज्ञानशाखा, संशोधने आणि तिन्हिकाळांचा वेध घेत साकारलेला हा महाग्रंथ म्हणेज विचारक्षेत्रातील एक वैभव ठरावा. माणसाचा वेध घेणाऱ्या 'मानव आणि धर्मचिंतन' तसेच 'धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह' या त्रिखंडी ग्रंथ मालिकेतील 'भक्ती आणि धम्म' कळस ठरल्यास आश्चर्य वाटायला नको. - उत्तम कांबळे